ब्रह्मपुरी प्रतिनिधी संजय बागडे : चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यातील सावलगाव येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अत्यंत दुरवस्थेत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असून, अंत्यसंस्कारासाठी पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी नागरिकांना चक्क ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागत आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि खराब मार्गामुळे पायी जाणेही कठीण झाले आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना नातेवाईकांना अक्षरशः मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. अशा वेळी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठीही जर खराब रस्त्यामुळे नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बाब आहे.
“जिवंतपणी अनेक अडचणी सहन कराव्या लागतात; पण माणसाला मरणानंतरही अशा खडतर रस्त्यावरून सोसत फिरवत नेण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागत असल्याने अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक खर्चाचा बोजाही पडत आहे. शिवाय पावसाळ्यात रस्ता अधिकच खराब झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
सावलगाव येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याचे मजबुतीकरण, खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे आणि आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्मशानभूमी ही गावासाठी अत्यावश्यक सुविधा असून, तेथे जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध असणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती डागडुजी न करता स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून तातडीने काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दुःखाच्या प्रसंगी तरी नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास होऊ नये, एवढीच सावलगावकरांची अपेक्षा आहे. प्रशासन आता या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق