जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने शाळेच्या ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्य समन्वयिका सौ. पद्मजाताई अत्रे, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, ग्रंथपाल सुनील अंबिकर, सहायक ग्रंथपाल जावेद पटेल यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहन केले. प्रदर्शनात धार्मिक, ऐतिहासिक, साहित्यिक, कादंबऱ्या, थोर पुरुषांची आत्मचरित्रे, संस्कारकथा, मूल्यवर्धन कथा, प्रवासवर्णने, कविता, रामायण, महाभारत तसेच डॉ. कलाम लिखित पुस्तकांचा समावेश होता.
विद्यालयातील दोन्ही विभागांतील विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन विविध पुस्तकांचे वाचन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांची माहिती मिळून ज्ञानात भर घालण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक संजय वानखेडे यांनी केले, तर मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



إرسال تعليق