प्रतिनिधी - श्री सुरज पवार
वडगाव रोड : येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १४ ऑक्टोबर २०२६ रोजी SVEEP कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जिन्नेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक राजू कुयटे उपस्थित होते. तसेच विवेक ढेरे, राजू ढवक व विजय राठोड यांची उपस्थिती होती. प्रारंभी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्रतापसिंग आडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
मतदानाचे महत्त्व, नागरिकांचे कर्तव्य आणि मतदानाचा अधिकार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये जागृती निर्माण करणे, तसेच मतदार यादीत नाव नोंदविण्याबाबत नागरिकांना जागरूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
यावेळी राजू कुयटे यांनी मतदानासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी आणि नाव नसल्यास नोंदणीसाठी तत्पर राहावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रशांत जिन्नेवार यांनी अशा उपक्रमांमुळे मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.
बी.एड. छात्र प्रशिक्षणार्थी निलेश संजय चव्हाण व दत्ता संजय कोवे यांनी स्पर्धांच्या आयोजनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता कोवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिकेत राठोड व भारत भाऊ कांबळे यांनी सहकार्य केले.

إرسال تعليق