Top News

भुसावळात एक हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा शिपाई आणि सायबर कॅफे चालक जाळ्यात

 


नेहते हॉस्पिटलजवळ एसीबीचा सापळा; जमीन मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी मागितली होती लाच

भुसावळ (प्रतिनिधी) : शेतजमिनीच्या मोजणीतील त्रुटी दूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील आणि सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी नेहते हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराची भुसावळ तालुक्यातील गोजोरे शिवारात शेतजमीन आहे. मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन अर्ज करून दोन हजार रुपयांचे शासकीय चलन भरले होते. त्यानंतर मोजणी प्रकरणात त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झाला. या त्रुटींची पूर्तता करून देण्यासाठी सायबर कॅफे चालकाने भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाच्या नावाने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर पथकाने सापळा रचला. जामनेर रोडकडून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ सायबर कॅफे चालकाने तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारताच एसीबीने दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.




Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज