यवतमाळ प्रतिनिधी - श्री सुरज पवार
‘मेरा युवा भारत’, यवतमाळ (महाराष्ट्र) युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या वतीने वडगाव रोड येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘भारताच्या जडणघडणीमध्ये युवकांचे योगदान’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक, श्री वसंत नाईक शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, दलित मित्र व शिक्षणाचे कैवारी माजी आमदार स्व. प्रतापसिंग आडे तसेच संस्थेच्या मातोश्री निर्मलाताई आडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रशांत जिन्नेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेश ढवक, श्री. विवेक ढेरे आणि श्री. विजय राठोड उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांची भूमिका, जबाबदारी आणि योगदान यावर प्रभावी विचार मांडले. राष्ट्र ही आपली ओळख असून, राष्ट्र सक्षम व सशक्त करण्यासाठी युवकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असा सूर विद्यार्थ्यांच्या भाषणातून उमटला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रशांत जिन्नेवार यांनी राष्ट्र उभारणीत प्रत्येक विद्यार्थ्याचे योगदान ही नैतिक जबाबदारी असून, ती सक्षमपणे पार पाडण्याचे आवाहन केले. श्री. विवेक ढेरे यांनी ‘राष्ट्र उभारणी ही आपली जबाबदारी’ हा व्यापक विचार मांडला, तर श्री. राजू ढवक यांनी युवकांनी राष्ट्र उभारणीसाठी भरीव योगदान देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. परिसरातील केरकचरा जमा करून शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
🥇 प्रथम क्रमांक – कार्तिक जाधव, इयत्ता १०वी
🥈 द्वितीय क्रमांक – समृद्धी टेकाम, इयत्ता ९वी
🥉 तृतीय क्रमांक – अमन खुशाल राठोड, इयत्ता ८वी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. राजू कुयटे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अनिकेत राठोड व श्री. भारत भाऊ कांबळे यांचे सहकार्य लाभले.



إرسال تعليق