Top News

शेतीच्या सातबारावरील नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच; पाचोऱ्यात स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा

 


पाचोरा प्रतिनिधी / शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारात असलेल्या कालबाह्य नोंदी कमी करून देण्यासाठी सुमारे ८५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील स्टॅम्प वेंडरविरुद्ध पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

समाधान सुभाष पाटील (४०, रा. कुऱ्हाड बु., ता. पाचोरा) असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या मौजे कुऱ्हाड बु. (ता. पाचोरा) येथील शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात कालबाह्य नोंदी कमी करण्याचे काम होते. या कामासाठी तक्रारदाराने संबंधित तलाठी नकुल काळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ८० हजार रुपये लाचेची मागणी करुन स्टॅम्प वेंडर समाधान पाटील यास पैसे दिल्यावर तुमचे काम होईल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या मागणीबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

तडजोडीनंतर ८५ हजारांवर व्यवहार

७ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी स्टॅम्प वेंडर समाधान पाटील याने तक्रारदाराकडे ९० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. त्यानंतर पाटील याने तडजोडीअंती ८५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. ९ ऑगस्टच्या दुसऱ्या पडताळणीदरम्यान तक्रारदाराने संबंधित तलाठ्याशी संपर्क साधला. मात्र, स्टॅम्प वेंडर समाधान पाटील याने लाचेची मागणी केल्याची माहिती तलाठी नकुल काळकर यांना दिल्यानंतरही त्यांनी तक्रारदाराला संबंधित रक्कम देण्यास मनाई केली नाही. वरुन त्याच्याशी माझा काहीएक संबंध नसून ते काम तहसीलदारांच्या हातात आहे, असेही सांगितले.

पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, लाच प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याचे माहिती झाल्यानंतर संशयिताने तक्रारदाराच्या घरी जाऊन सदर कामासाठी पैसे देण्याची गरज नसून त्यांचे काम तलाठी काळकर यांचेकडून करुन देतो, असे सांगितले. परंतु, लाच मागितल्याचे आधीच निष्पन्न झाल्याने २० ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात समाधान पाटील याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. कायदेशीर कारवाईनंतर पाटील यास लागलीच अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या पथकाने यशस्वी केली.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज