Top News

बंजारा इतिहास संशोधनाला व्यासपीठ मिळणे ही स्वागतार्ह बाब!


प्रतिनिधी - श्री सुरज पवार 

        "Who Were The Banjara : One Nation One Sub Categorisation" या ६०० पानी संशोधनात्मक ग्रंथाची University News मधील 'Best Five Books' या सदरात नोंद झाल्याची माहिती निश्चितच बंजारा साहित्य, इतिहास आणि संशोधनाच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. डॉ. अशोक शंकरराव पवार आणि डॉ. सुनिता राठोड पवार ताई यांनी दीर्घकाळ संशोधन करून हा ग्रंथ साकारला आहे. त्यांच्या या परिश्रमांसाठी कौतुक आणि अभिनंदन झालेच पाहिजे.

            बंजारा समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करताना मात्र गौरवाबरोबरच पुराव्याला, संदर्भांना आणि शास्त्रीय संशोधनपद्धतीला समान महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे. एखाद्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये पुस्तकाची निवड किंवा प्रसिद्धी होणे ही त्याच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाची नोंद असू शकते; परंतु त्यातून ग्रंथातील प्रत्येक ऐतिहासिक निष्कर्ष आपोआप अंतिम किंवा सर्वमान्य ठरत नाही. त्या निष्कर्षांची स्वतंत्र ऐतिहासिक साधने, पुरातत्त्वीय पुरावे, भाषावैज्ञानिक अभ्यास, अभिलेख आणि इतर संशोधनांशी पडताळणी होणेही तितकेच आवश्यक आहे.

           बंजारा समाजाचा इतिहास हा केवळ गौरवगाथा म्हणून नव्हे, तर प्रामाणिक दस्तऐवजीकरणाचा विषय म्हणून पुढे आला पाहिजे. विविध संशोधकांनी मांडलेल्या मतांचा तुलनात्मक अभ्यास, उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक परीक्षण आणि नव्या संशोधनाला प्रोत्साहन मिळाले, तर बंजारा इतिहासलेखन अधिक समृद्ध होईल.

            या पार्श्वभूमीवर या ग्रंथाची दखल घेतली गेल्याची बाब बंजारा समाजातील साहित्यिक, संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी संशोधनाची नवी दारे उघडणारी संधी ठरू शकते. या निमित्ताने बंजारा इतिहास, गोरमाटी भाषा, लोकपरंपरा, स्थलांतर, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक परिवर्तन आदींवर यापुढे अधिकाधिक वस्तुनिष्ठ संशोधन व्हावे, हीच अपेक्षा.

           इतिहासाचा अभिमान असावा; पण त्या अभिमानाला पुराव्याची आणि चिकित्सक संशोधनाची जोड असावी. तेव्हाच इतिहास पुढील पिढ्यांसाठी विश्वासार्ह वारसा ठरेल. आणि हा वारसा डॉ. अशोक शंकरराव पवार व डॉ. सुनिता अशोक पवार ताई यांनी मोठ्या अभिमानाने जपण्याचे काम केले आहे त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील साहित्य निर्मितीसाठी माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा....!

✍️ सौजन्य - बाबुसिंग राठोड

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज