![]() |
| शाखा व्यवस्थापकाच्या चौकशीसह RBI लोकपाल व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार |
ब्रह्मपुरी (विशेष प्रतिनिधी)संजय बागडे : भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) गांगलवाडी शाखेच्या कथित मनमानी व शेतकरीविरोधी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) नेतृत्वाखाली बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी बँकेवर भव्य मोर्चा काढला. शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होत बँक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनानंतर भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी RBI लोकपाल, SBI चे विभागीय व्यवस्थापक (चंद्रपूर) तसेच मुख्य महाव्यवस्थापक (नागपूर) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले ना-देय प्रमाणपत्र (No-Dues) देण्यास शाखेकडून दिरंगाई केली जात आहे. तसेच थकीत कर्ज अथवा तांत्रिक कारणांच्या आधारे कोणतीही पूर्वसूचना न देता बचत खाती ‘डेबिट फ्रीझ’ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय पीएम-किसान, अतिवृष्टी मदत व पीक विम्याच्या माध्यमातून खात्यात जमा होणाऱ्या DBT रकमेची थकीत कर्जापोटी परस्पर कपात केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. KYC तसेच सर्व्हरच्या कारणांमुळे ज्येष्ठ व अशिक्षित शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रारही आंदोलनकर्त्यांनी केली.
२८ ऑगस्ट रोजी निवेदन, तरीही दखल नसल्याचा आरोप
या समस्यांबाबत २८ ऑगस्ट २०२६ रोजी बँक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
७ दिवसांचा अल्टिमेटम
गोठवलेली खाती तात्काळ पूर्ववत करावीत, २४ ते ४८ तासांत ना-देय प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अनुदानातून कपात झालेली रक्कम खात्यात परत जमा करावी तसेच शाखा व्यवस्थापक निरंजन रंगारी यांच्या कथित शेतकरीविरोधी कारभाराची विभागीय चौकशी करून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा मागण्या तक्रारीत करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांवर ७ दिवसांच्या आत सकारात्मक तोडगा न निघाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी दिला.
यावेळी सुनील शेंडे, धनराज ठाकरे, संजय भोयर, मनोहर भरे, उपसरपंच गोटेफोडे, केवळराम नरुले, विजय भोयर, मधुकर राऊत यांच्यासह मुडझा-आवळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, चंद्रपूर आणि तहसीलदार, ब्रह्मपुरी यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.


إرسال تعليق