![]() |
| विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जपण्यासह व्यसनांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन |
वडगाव रोड, दि. १६ सप्टेंबर २०२६ : स्थानिक वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रोड येथे बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी मानसिक आरोग्य व व्यसनाधीनता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निमंत्रित नितीन कांबळे, मोहित पोहेकर आणि सागर परोपटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक तसेच श्री वसंत नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक शिक्षणमहर्षी प्रतापसिंग आडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक विवेक ढेरे होते. यावेळी राजू ढवक, राजू कुयटे आणि विजय राठोड यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सागर परोपटे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेला आत्मविश्वास, भीती व मानसिक ताण यांचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मोहित पोहेकर यांनी व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थी दशेतच व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर नितीन कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाप्रती तसेच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून सकारात्मक विचारांसह जीवनाची वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राठोड यांनी केले. राजू कोठे यांनी सूत्रसंचालन केले, तर ओम शंकर अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत राठोड व भारत कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.



إرسال تعليق