Top News

संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाचा भर; जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश


मुंबई | दि. ३० सप्टेंबर २०२६ : संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासोबतच जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करावीत. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करून टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती संभाजीनगर, नाशिक व पुणे विभागातील संभाव्य पाणीटंचाईबाबत मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी टंचाईग्रस्त गावांतील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नाला खोलीकरण, गाळ काढणे, बंधारे, शोषखड्डे, रिचार्ज शाफ्ट, विहिरींची दुरुस्ती व खोलीकरण, नवीन विंधन विहिरी तसेच जलसाठवण क्षमता वाढविण्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे पाटील यांनी सांगितले.

१५ ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर, खनिकर्म निधी, जलजीवन मिशन आणि अन्य उपलब्ध निधींचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

पर्जन्यमान, भूजल पातळी, उपलब्ध पाणीसाठा आणि जलस्रोतांची स्थिती लक्षात घेऊन ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या तीन कालावधींसाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“टँकर सुरू करण्यापेक्षा टँकरची गरजच भासणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे,” असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज