Top News

अमरावतीत २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

औषधांच्या ओव्हरडोसचा संशय; व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

अमरावती (प्रतिनिधी अविनाश गोंडाणे) : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच बी.ए.एम.एस.ची पदवी घेतलेल्या २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा राहत्या घरी झोपेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आदित्य रावटे असे मृत डॉक्टरचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून व्हिसेरा तपासणी व सविस्तर शवविच्छेदन अहवालानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकतीच बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली होती. तो आपल्या खोलीत झोपलेला असताना त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेह उलट्या अवस्थेत असल्याचे तसेच डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

आई-वडिलांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती

आदित्यला लहानपणापासून अपस्माराचा (फिट्स) त्रास असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली आहे. तसेच त्वचेचा रंग गोरा करण्यासाठी तो काही औषधांचा स्वतःवर प्रयोग करून उपचार घेत असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे पोलिसांकडून समजते. त्यामुळे संबंधित औषधांचा अतिमात्रेत वापर झाल्याने विषबाधा किंवा ओव्हरडोस झाला असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.

शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार

प्राथमिक शवविच्छेदनाच्या माहितीनुसार गुदमरल्याने तसेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, औषधांमुळे विषबाधा झाली होती का, अपस्माराच्या त्रासामुळे मृत्यू झाला की अन्य कोणते कारण होते, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी व्हिसेरा तपासणी तसेच सविस्तर शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालानंतरच या गूढ मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरुण मुलाच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज