पाळधी | दि. ३० सप्टेंबर २०२६ : पाळधीतील राजकुवर नगर व काशी पंढरी नगर परिसरात मध्यरात्री चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री अडीच ते पहाटे चार वाजेच्या सुमारास या घटना घडल्याची माहिती आहे.
नैनेश वसंतराव शिसोदे (रा. अमळनेरकर) यांची MH 19 CL 2774 क्रमांकाची दुचाकी नेहमीच्या ठिकाणी न दिसल्याने त्यांनी शोध घेतला. ही दुचाकी रेल्वे स्टेशनजवळील राजकुवर नगर परिसरात आढळून आली. याच ठिकाणी ज्ञानेश्वर गंगाराम फुलपगार यांच्या नवीन घराच्या लोखंडी दरवाजाचे लॉक तोडलेले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळले.
काशी पंढरी नगरातील संगीता नीलकंठ पाटील यांच्या बंद घरातील साहित्यही अस्ताव्यस्त करण्यात आले. तसेच हर्षल अनिल माळी यांच्या घराचे दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक करून त्यांना घरात बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. मात्र, चोरट्यांच्या हाती दोन्ही घरांमधून कोणताही ऐवज किंवा दागिने लागले नसल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

إرسال تعليق