प्रतिनिधी - श्री. सुरज पवार
वडगाव रोड : येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच संस्थेच्या संस्थापिका व मातोश्री निर्मलाताई आडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जिन्नेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक राजू कुयटे, विवेक ढेरे, ढवक व भारत राठोड उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व निर्मलाताई आडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षक प्रशिक्षणार्थी निलेश चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शिक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक असून विद्यार्थ्यांच्या अंधकारमय जीवनवाटेला ज्ञानाच्या प्रकाशाने उजळविण्याचे कार्य शिक्षक सातत्याने करतात, असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ शिक्षक विवेक ढेरे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. राजू कुयटे यांनी चांगला समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका दिशादर्शक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रशांत जिन्नेवार यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल सदैव कृतज्ञ राहावे, असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले, तर आभार जानवी किनगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारत राठोड यांनी परिश्रम घेतले.

إرسال تعليق