बसेस थांबल्या नाहीत तर विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
साळवा, ता. धरणगाव : साळवा फाटा येथे एस.टी. बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शने केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून साळवा फाट्यावर एस.टी. बसेस थांबत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. साळवा, साकरे, निशाणे व गोंदेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी दररोज चोपडा येथे जातात. मात्र, साळवा फाट्यावर बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे.
बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने बससेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मागणीची दखल घेऊन साळवा फाट्यावर बसेस थांबविण्यात आल्या नाहीत, तर विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पालकांसह अर्चिता पाटील, दिक्षा भिल, दुर्गेश्वरी पाटील, धनश्री पाटील, दिव्या पाटील, हर्षदा पाटील, गौरव पाटील, हेमेश पाटील, कपिल पाटील, गौरव पारधी, कीर्तन गुजर, निखिल पाटील, हितेश कुंभार, नरेंद्र कुंभार, प्रेमचंद अत्तरदे, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, विनोद पाटील, अनिकेत पाटील, भावेश पाटील, ज्ञानेश्वर सोनार आदी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी साळवा फाट्यावर एस.टी. बसेस थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आली आहे.
إرسال تعليق