मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; आदिवासी संस्कृती व हक्कांचे जतन करण्यातानाच आधुनिकता स्वीकारण्याचे आवाहन
ब्रम्हपुरी : येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक भगवान कन्नाके होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राजू भागवत, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तसेच तुलसीदास कुडमेथे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून गोविंदराव ढगे, निवृत्त शिक्षक, गणेश सलामे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते, कैलास गोरकर तसेच वसतिगृहाचे गृहपाल सदाशिव नरताम उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आदिवासी समाजाचे हक्क, परंपरा, संस्कृती, कला व सामाजिक योगदान याबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाने आपल्या समृद्ध परंपरा व सांस्कृतिक वारशाचे जतन करत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना आपल्या समाजाच्या विकासासाठी ज्ञान, संघटन आणि सामाजिक जाणीव आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत आधुनिक शिक्षणाच्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयाचे कर्मचारी रोशन टेकाम , सूत्रसंचालन विद्यार्थी भाविक कुंभरे यांनी केले, तर ऋषभ कोल्हे यांनी उपस्थित मान्यवर, वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

إرسال تعليق