Top News

जागतिक स्तरावर मराठी भाषेचे स्थान मजबूत आणि अभिमानास्पद : डॉ. मनीष गवई


लेह-लडाखमध्ये शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील साहित्यिकांचा सहभाग

अमरावती (प्रतिनिधी) : मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि जगभर प्रसार करण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी आपापसातील भेदभाव व राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीची पताका सातासमुद्रापार फडकली पाहिजे. जागतिक स्तरावर मराठी भाषेचे स्थान अतिशय मजबूत व अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन अमरावतीचे सुपुत्र, भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी केले.

लेह-लडाख येथे आयोजित शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अकराव्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, प्रबोधनकार आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने, उद्घाटक म्हणून पुण्याच्या माजी मनपा आयुक्त संगीता धायगुडे, तर प्रमुख अतिथी म्हणून लेह विद्यापीठाच्या कुलगुरू प्रतिनिधी व डीन ऑफ लँग्वेजेस डॉ. तस्लिम झांगो उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गवई यांनी मराठी भाषेच्या वैश्विक विस्तारावर प्रकाश टाकला. लोकसंख्येच्या दृष्टीने मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील ७० हून अधिक देशांमध्ये मराठी भाषिक वास्तव्यास असून विविध माध्यमांतून ते भाषा व संस्कृतीचे जतन करीत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेला सुमारे २,५०० वर्षांची समृद्ध परंपरा असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे मराठी भाषा व संस्कृतीला मोठी समृद्धी प्राप्त झाली. केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता दिल्याने मराठी भाषेच्या संशोधनाला आणि जागतिक महत्त्वाला नवी दिशा मिळाली आहे, असे डॉ. गवई यांनी स्पष्ट केले.

अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मॉरिशस तसेच आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक वास्तव्यास असून विविध मराठी मंडळांच्या माध्यमातून ते भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवत आहेत. इंटरनेट, सोशल मीडिया आणि विकिपीडियासारख्या जागतिक व्यासपीठांवरही मराठी भाषेचा वापर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था, त्यांचे प्रतिनिधी आणि देश-विदेशात राहणाऱ्या मराठी भाषिकांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. मराठीला जागतिक स्तरावर भक्कम ओळख मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे,” असे आवाहन डॉ. गवई यांनी केले.

यावेळी डॉ. मनीष गवई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संमेलनाचे प्रास्ताविक मुळावा येथील मिलिंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख, प्रख्यात साहित्यिक व प्रबोधनकार प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले. संमेलनाचे संचालन शब्दच्या उपाध्यक्ष शशी डंबारे यांनी केले. यावेळी डॉ. अनिल काळबांडे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

संमेलनात महाराष्ट्रातून समाजसेवी डॉ. अजय नरवाडे आणि ज्येष्ठ छायाचित्रकार रमेश भागवत यांचा विशेष सहभाग होता. संमेलनाचे मुख्य संयोजक तथा शब्दचे प्रमुख संजय सिंगलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मराठी साहित्याचा वैश्विक जागर घडविणाऱ्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे हे अकरावे पर्व लेह-लडाखमध्ये आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषेचा जगभर प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने शब्द परिवाराच्या वतीने यापूर्वी थायलंड, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर आणि भूतान येथेही विश्व साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत.

या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांची निवड झाल्यामुळे अमरावतीच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज