Top News

राष्ट्रीय हरित सेनेचा कौतुकास्पद उपक्रम; ‘रेशीम बंध पर्यावरण समतोलाचा’ अंतर्गत वृक्ष राखी पौर्णिमा उत्साहात


प्रतिनिधी श्री. सुरज पवार 
वडगाव रोड : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय, वडगाव रोड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या सहकार्याने प्रताप इको क्लबच्या वतीने ‘रेशीम बंध पर्यावरण समतोलाचा’ या संकल्पनेअंतर्गत वृक्ष राखी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रशांत जिन्नेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी शिक्षक श्री. राजू ढवक, तसेच शिक्षक श्री. राजू कुयटे, श्री. विवेक ढेरे, श्री. विजय राठोड आणि पालक प्रतिनिधी कुसुमताई अंबाडरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक तसेच श्री वसंत नाईक शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक, शिक्षणमहर्षी दलित मित्र श्री. प्रतापसिंग आडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

प्राचार्य प्रशांत जिन्नेवार यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण-समारंभ साजरे करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. वृक्ष राखी पौर्णिमा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दिवाळी, होळी तसेच नैसर्गिक रंगांची निर्मिती अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी भविष्यात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी शिक्षक राजू ढवक यांनी विद्यार्थ्यांना घरच्या घरी पर्यावरणपूरक राख्या तयार करून आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी सुबक व आकर्षक राख्या तयार करून आणल्या. या राख्या विद्यालयाच्या परिसरातील झाडांना बांधून ‘वृक्ष माझा सखा, वृक्ष माझा मित्र’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या विचारांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे, तसेच वृक्षांशी भावनिक नाते निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे राजू ढवक यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनीही या अभिनव उपक्रमाला भरघोस प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये भविष्यातही सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक राजू कुयटे व विवेक ढेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. भाग्यश्री भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे लिपिक अनिकेत राठोड तसेच सेवक भारत कांबळे यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमातून राखीच्या नात्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश रुजविण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज