Top News

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात.


नवीन शैक्षणिक वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड; गुणवंत व NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी ९.३० वाजता झालेल्या या सभेला पालक व शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. 
सभेच्या प्रारंभी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपाध्यक्ष तथा बाल समुपदेशक श्री. मकरंद डबीर, श्री. मोहन सपकाळे, पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, सौ. रमा तारे आणि सचिव श्री. योगेश सोनजे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सभेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव श्री. योगेश सोनजे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावेळी शालांत परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. स्मिता करे यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील जमा-खर्च अहवालास मंजुरी देण्यात आली. गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना सहाय्य करणे, वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना तात्पुरती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचे आयोजन व त्यासाठीच्या खर्चास मंजुरी देणे, वर्गनिहाय वार्षिक अभ्यासक्रम पत्रक देणे तसेच शासन निर्देशित समित्यांची कार्यवाही करणे आदी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

नूतन कार्यकारिणी जाहीर

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली—

- अध्यक्ष: श्री. सचिन देशपांडे (मुख्याध्यापक)
- उपाध्यक्ष (पालक प्रतिनिधी): श्री. प्रफुल्ल नामदेव म्हसकर
- चिटणीस: श्री. योगेश सोनजे
- सह-चिटणीस: सौ. सुवर्णा वंजारी

याशिवाय शाळेच्या प्रत्येक तुकडीमधून प्रत्येकी एक माता पालक व एक पिता पालक यांची वर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
पालकांनी शाळेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी नियमित संवाद साधावा, तसेच शाळा व शिक्षकांच्या संपर्कात राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले.

सभेचे सूत्रसंचालन सचिव श्री. योगेश सोनजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. ए. व्ही. चौधरी यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज