पाळधी (प्रतिनिधी): पाळधी येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नृत्य सादर केले. तसेच अभंग, भजन, हरिपाठ आणि विठ्ठल नामस्मरणाच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. संतांच्या शिकवणुकीनुसार सत्य, सदाचार, सेवा, समता आणि भक्ती ही जीवनमूल्ये आत्मसात करण्याचा संदेशही देण्यात आला.
या प्रसंगी आबासो. रवींद्र चौधरी, संचालक विजय चौधरी, आर. बी. पाटील, विभावरीताई पाटील, जी. डी. पाटील, प्राचार्य आर. एल. माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या भक्तिमय उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अनुभवात्मक ओळख झाली.
إرسال تعليق