धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणीत सेवा केंद्र येथे पवित्र अधिकमास, पौर्णिमा व गंगा दशहरा पर्वाचे औचित्य साधून विविध धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.सामुदायिक श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, नामजप, स्वामी स्मरण, पर्जन्यवृष्टीसाठी वैदिक परंपरेनुसार सामुदायिक पर्जन्यसूक्त पठण तसेच आंब्यांच्या भव्य रासेने सजलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दरबारात अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
याचबरोबर प.पू. गुरुमाऊली यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानुसार रामेश्वर येथील पावन त्रिवेणी संगमावर तापी, गिरणा व अंजनी नदीमातेचा सन्मानपूर्वक मानसन्मान करण्यात आला. नदी स्वच्छता अभियानाद्वारे जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि भारतीय सनातन संस्कृतीतील निसर्गपूजेची महान परंपरा जपण्याचा संदेश समाजापुढे ठेवण्यात आला. साक्षात सूर्यनारायणाच्या साक्षीने पार पडलेल्या या उपक्रमास सेवेकरी बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भक्ती, सेवा, साधना, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि समाजजागृती यांचा अद्वितीय संगम घडविणाऱ्या या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व सेवेकरी परिवाराने मोलाचे योगदान दिले. श्री स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखाली संपन्न झालेल्या या दिव्य सोहळ्याने उपस्थितांच्या अंतःकरणात श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माची ज्योत अधिक प्रज्वलित करून चिरंतन संस्कारांची अमिट छाप उमटविली.
إرسال تعليق