धरणगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धरणगाव शहर शाखेतर्फे आज धरणगाव शहरात जनसंपर्क अभियान राबवित शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. तसेच काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती, ध्येयधोरणे आणि विचार यांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या जनसंपर्क अभियानाची सुरुवात छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश आण्णा भागवत आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले, त्यानंतर जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत शहरातील धरणी चौक, बालाजी मंदिर, मोठा माळी वाडा, कोट बाजार, छ.शिवाजी तलाव, आठवडे बाजार आदी भागात जनसंपर्क करण्यात आला. यावेळी नागरिकांना काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती, ध्येयधोरणे आणि पक्षाची भूमिका याबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली. यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे आणि तिरंगी दुपट्टे परिधान केले होते. विविध घोषणा देत पक्षाचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्क अभियानादरम्यान राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकांनाही भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्मारकांना हार अर्पण करून महापुरुषांना अभिवादन केले. तसेच विविध घोषणा देण्यात आल्या. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून काँग्रेस पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. या जनसंपर्क अभियानात ओबीसी संघटनेचे प्रदेश सचिव रामचंद्र महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश पवार, विजय जनकवार, सुनील सोनार, दिनेश पाटील, बाळू पाटील, विकास लांबोळे, सलीम बेलदार, ताराचंद महाराज, राजेंद्र पाटील, कदीर पटेल, सुनील सोनवणे, युवक काँग्रेसचे भुषण भागवत, योगेश येवले, गौरव चौहान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा