Top News

पाळधी येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन; हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा


पाळधी, जळगाव : विजयादशमीनिमित्त पाळधी येथील आठवडे बाजार चौकातील (भगवा चौक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंडित समर्थराव यांनी मंत्रोच्चारांसह विधीवत शस्त्रपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाचे स्मरण करून हिंदू संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान यांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योगपती दिलीप बापू पाटील, अनिल भैय्या कासट, सनातनचे संत श्री. नंदकुमार जाधव आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांची उपस्थिती लाभली. शस्त्रपूजनाच्या वेळी अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांचा सत्कार अनिल भैय्या कासट यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश महाजन यांनी केले.


अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांचा सत्कार अनिल भैय्या कासट व मा. प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

या वेळी पाळधी येथील सर्व दुर्गादेवी उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, शिवझेप प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गोप्रेमी तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शस्त्रपूजनाचे महत्त्व विशद

या प्रसंगी निखिल कदम यांनी शस्त्रपूजनाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केले. शौर्य, स्वाभिमान आणि धर्मपरंपरेचे जतन करण्यासाठी समाजाने जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.


 उपस्थित संत व हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी 

अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे

त्यानंतर अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात धर्मावरील कथित आघात, जागतिक घडामोडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास यांचा संदर्भ दिला. तसेच लव्ह जिहाद आणि वक्फ बोर्ड कायदा यांविषयी आपली भूमिका मांडून उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.

‘हिंदुराष्ट्र आव्हानी’ येथे अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांचा सत्कार

शस्त्रपूजन कार्यक्रमानंतर अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांनी   ‘हिंदुराष्ट्र आव्हानी’ येथे भेट दिली. त्या वेळी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. हिंदु राष्ट्राची संकल्पना तसेच गावातील विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध धार्मिक, सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शस्त्रपूजनाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज