गिरणा कालव्याचे पाणी तातडीने सोडा; सहारा बहुद्देशीय संस्थेतर्फे पाटबंधारे विभागाला निवेदन
धरणगाव (प्रतिनिधी):
चालू वर्षी खरीप हंगामाला दुष्काळाचा मोठा फटका बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सुदैवाने गिरणा धरण १०० टक्के भरलेले असतानाही कालवा सल्लागार समितीची बैठक रखडल्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संभ्रम दूर करून रब्बी पेरणीपूर्वी किमान एक सिंचन आवर्तन तातडीने सोडावे, या मागणीसाठी सहारा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने धरणगाव पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संदीप पेंढारे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
इतर प्रकल्पांचे नियोजन झाले, मग गिरणेचा मुहूर्त का टळेना?
राज्यातील दारणा प्रकल्प गोदावरी कालवा अंतर्गत रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आवर्तनांचे नियोजन जाहीर झाले आहे. खडकवासला धरणातूनही पिकांची गरज ओळखून वेळेआधी आवर्तन सुरू करण्यात आले असून पूर्णा व इसापूर प्रकल्पांचेही रब्बी नियोजन निश्चित झाले आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त का लागत नाही, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
अध्यक्ष लक्ष्मण विठोबा माळी यांची प्रतिक्रिया
इतर प्रकल्पांचा आदर्श घ्या आणि गिरणेचे आवर्तन सोडा;
"राज्यातील इतर धरणांच्या कालवा सल्लागार समित्यांच्या बैठका पार पडून रब्बी व उन्हाळी पिकांचे नियोजन अधिकृतपणे जाहीर झाले आहे. मग गिरणा धरण पूर्ण भरलेले असताना आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरच ही वेळ का? ज्वारी, हरभरा, गहू, मका यांसारखी रब्बी पिके घ्यायची की जनावरांच्या चाऱ्याची सोय करायची, या संभ्रमात शेतकरी अडकला आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा थांबवून कालवा सल्लागार समितीची बैठक तात्काळ घ्यावी आणि चारा पिके व विहिरींच्या पुनर्भरणासाठी पेरणीपूर्वी किमान एक आवर्तन तातडीने सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र लढा उभारला जाईल."
शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
निवेदन देतेवेळी सहारा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक लक्ष्मण विठोबा माळी, उपाध्यक्ष विनोद रोकडे, सचिव रमेश चव्हाण यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात धरणगाव येथून रणजीत शिखरवार, नानाभाऊ महाजन, पंढरनाथ महाजन, भैयाभाऊ पाटील, विठ्ठल महाजन; बाभळे बु. येथून नवल महाजन, भगवान पाटील, लखन महाजन, पवन महाजन; पिंपळे खुर्द येथून समाधान महाजन, तुकाराम महाजन, रवींद्र पाटील तसेच पष्टाणे येथील दिनकर पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा