Top News

तरसोद–पाळधी बायपासवर भीषण अपघात; क्रेन कोसळून चालक मधुकर पाटील यांचा मृत्यू

 


पाळधी : तरसोद–पाळधी बायपासवरील आसोदा जवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना आज सायंकाळी भीषण अपघात घडला. वजनदार गर्डर उचलण्याचे काम सुरू असताना सुमारे १०० फूट उंचीवरून मोठी क्रेन कोसळली. या दुर्घटनेत क्रेनचालक मधुकर धनराज पाटील (माळी), रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, बायपासच्या दुरुस्तीच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीमुळे खचला होता बायपास

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद ते पाळधी बायपास अवघ्या एका वर्षात खचल्याने या मार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आसोदा जवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळचा रस्ता खचला होता. परिणामी, या मार्गावरील वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

हे काम दीड महिन्यात पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही. सध्या या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असून, पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच आहे.

दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना

खचलेल्या पुलाची दुरुस्ती मुळापासून करण्यात येत असल्याने या कामासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, आज सायंकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ वजनदार गर्डर उचलण्याचे काम सुरू असताना मोठी क्रेन सुमारे १०० फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत चालक मधुकर धनराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रेल्वे उड्डाणपुलाचाही काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

बायपास बंद झाल्यास जळगाव शहरावर वाहतुकीचा ताण

या अपघातामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव बायपासवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्यास वाहतूक पुन्हा जळगाव शहरातून वळवावी लागू शकते. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढून वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी

बायपास खचणे, दुरुस्तीला होणारा विलंब आणि आता क्रेन कोसळून झालेली जीवितहानी, या घटनांमुळे महामार्गाच्या कामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अपघाताची कारणे निश्चित करावीत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, अपघातानंतर बायपासवरील वाहतुकीबाबत प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो आणि दुरुस्तीचे काम किती काळ लांबणीवर पडते, याकडे वाहनचालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज