धरणगाव, जळगाव (प्रतिनिधी) - धरणगाव नगरपरिषद, पाणी पुरवठा विभागाच्या दुटप्पी कारभाराचा बुरखा फाटला आहे. एकीकडे प्रशासनाकडून "नागरिकांना आवाहन - पाणी जपून वापरा, पाणीटंचाई टाळा!" अशा मोठमोठ्या जाहीर सूचना देऊन नागरिकांना पाणी वाया घालवल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आणि नळ कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली जात आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्षात नगरपरिषदेच्याच पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची उघडपणे नासाडी सुरू आहे.
सनातन सारथी न्यूजच्या हाती या संपूर्ण प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे लागले आहेत. या पुराव्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे की, नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीचा पाईप पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. कच्च्या रस्त्यावर पाण्याने प्रवाह तयार झाला असून, मोठ्या प्रमाणात डबकी साचली आहेत.
नागरिकांमध्ये संताप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नगरपरिषदेच्या अधिकृत पोस्टरमध्ये नागरिकांनी काय करावे याची यादी दिली आहे - नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, नळाला तोट्या लावाव्यात, टाकी भरल्यावर मोटार बंद करावी, गाडी धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, बादली-मग वापरावा. "पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती आहे" असे ज्ञान दिले जात आहे.
मात्र, हेच नियम नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत का? असा सवाल धरणगावकर विचारत आहेत. टाकी भरल्यानंतर मोटार बंद करण्याचे आवाहन करणारी नगरपरिषद स्वतःच मोटार बंद करायला विसरते, हे दुर्दैवी आहे. ज्या शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे प्रशासनाकडूनच अशी नासाडी होणे हे संतापजनक आहे.
जबाबदार कोण?
या संपूर्ण पाणी नासाडीला जबाबदार कोण? यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पाणी पुरवठा अभियंता यांनी उत्तर द्यावे. नागरिकांवर दंड लावणारे प्रशासन स्वतःच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? याकडे सर्व धरणगावकरांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा