![]() |
| ✒️प्राजक्ता कमल प्रकाश माळी नगाव, जि.धुळे |
भारताची समृद्ध संस्कृती सिंधू संस्कृती मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली अप्रतिम मातृसत्ताक पद्धती होती. कालांतराने परकियांनी या संस्कृतीवर आघात करून ही संपवली. जरी हे संस्कृती साहित्यातून कमी करण्याचा प्रयत्न झाला तरी देखील मूळनिवासी भारतीयांच्या परंपरेत ती दिसून येते. सृष्टीतील चैतन्याच्या आणि आदिशक्तीच्या उत्सव म्हणजे नवरात्र. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होऊन सुरू होणारा हा नऊ दिवसांच्या काळ फक्त धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो प्राचीन काळापासून नवरात्र हा कृषी संस्कृतीशी जुळलेला, निसर्गातील बदल संस्कृतीची जोपासना आणि स्त्री शक्तीचा जागरणाचा महान लोकोत्सव आहे.
भारताची पराक्रमी राणी निऋती हिने सर्वप्रथम शेतीचा शोध लावला. मातीच्या कुशीत तांदुळाचे बी पेरणारी पहिली कृषी माता निऋती होय. माता निऋतीची मुलगी दुर्गा हिने मातृसत्ताक परंपरा चालू ठेवली. स्वतः दुष्ट, कपटी, कुविचारी लोकांचा संहार केला. दुर्गाच्या अप्रतिम केलेल्या कार्यांचा गौरव म्हणजेच नवरात्रोत्सव होय. कृषी संस्कृतीत मातीने भरलेल्या परडीत अथवा जमिनीवर काळया मातीत पुढील हंगाम चांगल्या पद्धतीने येण्यासाठी घरोघरी विविध वाण टाकून नऊ दिवस घट बसविण्याची परंपरा होती. ज्या घटामध्ये उत्तम अंकुर असलेले असेल ते वाण पुढील हंगामासाठी वापरले जाईल. सर्वांनी केलेल्या बी अंकुरणाच्या घटाला देवीसमोर आणले जाई. त्यातून उत्तम वाणाची निवड होत असे. मातृसत्ताक पद्धतीत स्त्रीला प्राधान्य होते. यापूर्वी कित्येक वर्ष महिलांची मातृसत्ताक समतावादी सत्ता होती.
नांगराचा शोध लागल्यानंतर शेतीची जड कामे पुरुषांकडे गेली. शेतीत बी पेरण्याचे काम अद्यापही महिलेकडेच आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी महिला ही निर्मिकाची सर्वोत्तम कलाकृती मानली आहे. पुरुषापेक्षा कितीतरी पटीने संयम, निर्मिक्षम महिला आहे. असे त्यांनी आपल्या "सार्वजनिक सत्यधर्म" पुस्तकात सांगितले आहे. आजचा नवरात्रीचा महोत्सव देवीची पूजा करण्याचा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. तिला साडी चोळी अर्पण केली जाते. परंतु घरामधल्या महिलेला देवी प्रमाणे स्थान दिले जाते का ? अजूनही ती चूल आणि मूल याच्या पलीकडच्या दृष्टीने आपण पाहतो का ? हा मोठा यक्षप्रश्न आहे. दर अर्धा तासात एका स्त्री वर भारतात अत्याचार होतो. आमच्या देशातील महिला सुरक्षित आहेत का ? याचे उत्तर नाही येईल. आमचा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? तर नाही अजूनही ती वासनाधुंद नजरेचे भक्ष ठरली आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी महिलेच्या स्वातंत्र्यासाठी, स्वाभिमानासाठी वाईट रूढी, परंपरा यांच्यावर प्रहार केला. आमच्या महिला सावित्रीज्योतीच्या या कृतीची आठवण ठेवून सत्याचा शोध घेतात का? महिलेला महिला स्वाभिमानाने जगू देते का? तर अजूनही महिलेचे घरामध्ये गळचेपी होते. प्रसार माध्यमावर भोंदू महाराजांच्या शब्दाला प्रमाण मानणाऱ्या आमच्या माता भगिनी महिला खरंच सावित्रीच्या लेकी आहेत का ? तर उत्तर मिळते नाही! नवरात्रीच्या दिवसांमध्ये आमच्या संत-महापुरुषांनी सांगितलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय, करुणा, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, नैतिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अनमोल रंगाने आमच्या माता भगिनी नटल्या पाहिजे. स्वाभिमानाची ढाल त्यांच्याकडे असली पाहिजे. दुर्गाची आठवण ठेवली पाहिजे परंतु तिने केलेल्या प्रखर कार्याचे स्मरण ठेवले पाहिजे. कोणताही भोंदू महाराज आपल्याला फसवणार नाही याची दक्षता आमच्या माता-भगिनीने घेतली पाहिजे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी सर्वप्रथम महिलेच्या शिक्षणाचा ध्वज लावला. अनंत गुणांची खाण म्हणजे आपली माता-भगिनी आहे. ती साक्षात देवीच आहे. घरामध्ये सर्वांचे जेवण झाल्यानंतर उपाशी राहणारी एकमेव सहनशील माता हीच आहे. आजची दुर्गा अन्यायाविरुद्ध जागी झाली पाहिजे. विषमतेचे रोपटे तिने उखडून फेकले पाहिजे. तिला समाजामध्ये योग्य मान, प्रतिष्ठा, सन्मान मिळणे हीच खरी तिची पूजा ठरेल.
आज काळाच्या ओघात नवरात्रोत्सवाचे स्वरूप खूप बदलले आहे. पूर्वी घरापुढे किंवा गावातील मंदिरापुरती मर्यादित असणारी देवीची भक्ती आज सार्वजनिक उत्सवात आणि भव्य गरबा दांडिया नाईट्स मध्ये परावर्तित झाली आहे. तरुणाईचा वाढलेला उत्साह पारंपारिक संगीताला मिळालेली आधुनिक संगीताची जोड आणि नऊ दिवसांचे नऊ विशिष्ट रंग या बदलत्या काळाची वैशिष्ट्य आहे. नवरात्रीच्या नऊ रंगाची लुगडी परिधान करणे ही परंपरा पारंपरिक मूळची धार्मिक नसून, गेल्या काही वर्षांपासून संस्कृतीचा भाग बनली आहे. असे सारं काही असताना प्रत्यक्षात नवदुर्गांचा सन्मान कधी ? नवरात्रीत आपण मातीच्या मूर्तीची पूजा करतो. ललिता पंचमीला किंवा अष्टमीला कन्यापूजन करतो. पण खऱ्या अर्थाने या उत्सवाचे महत्त्व तेव्हाच सार्थ ठरेल, जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या प्रत्यक्षातील नवदुर्गांचा, म्हणजेच स्त्रियांचा आदर करू. आजची महिला ही शेती, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संरक्षण, पर्यावरण आणि अंतराळ संशोधनासारख्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. परंतु आजही तिला समान हक्क संधी आणि सुरक्षिततेसाठी लढा द्यावा लागतो. देवीच्या पूजेसोबतच समाजातील प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मान आणि जगण्याचे स्वातंत्र्य देणे. तिच्या कर्तुत्वाला वाव देणे. आणि तिच्या सुरक्षिततेची हमी घेणे. हाच या नवरात्रीच्या खरा संदेश असायला हवा. चैतन्य, ऊर्जा आणि मांगल्याचा हा उत्सव बाह्य देखाव्यावरून अंतकरणातील शुद्धतेकडे नेणारा असावा. नऊ दिवसाचा नवरात्रोत्सव आपल्यातील नकारात्मक विचारांचा ( काम, क्रोध, लोभ, अहंकाराचा नाश ) करून सकारात्मकतेचा कमलप्रकाश पसरणारा ठरो, हीच आदिशक्ती चरणी प्रार्थना!
🖊️प्राजक्ता कमल प्रकाश माळी (नगाव, जि.धुळे)

टिप्पणी पोस्ट करा