भादली येथे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) : “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांचे छोटे-छोटे प्रयोग हीच उद्याच्या प्रगत भारताची पायाभरणी आहे. विज्ञानाइतकेच अध्यात्म आणि चांगले संस्कारही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग मार्गदर्शनासाठी करावा; त्याचे गुलाम बनू नये. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश घराघरांत पोहोचवावा,” असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि महात्मा गांधी विद्यालय, भादली बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२६–२७ चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सहभागी बालवैज्ञानिकांचे अभिनंदन करून त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. तसेच प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शिक्षण विभाग, आयोजक आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पकता आहे. योग्य संधी मिळाल्यास गावातील एखादा विद्यार्थीही जगाला उपयोगी पडणारा शोध लावू शकतो. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सी. व्ही. रमण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दडलेले आहेत. शिक्षकांनी मुलांना प्रयोगशील बनवावे. मुलांनो, ‘मला जमणार नाही’ हा विचार मनातून काढून टाका. अपयशाने खचू नका. मोठी स्वप्ने पाहा आणि सातत्याने प्रयत्न करा. तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी सांगितले की, विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या उपजत जिज्ञासेला, कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करत नाविन्यपूर्ण प्रयोगांतून आपली गुणवत्ता आणि सर्जनशीलता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदर्शनात १३१ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी
भादली येथील जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकूण १३१ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्रयोगशाळा सहायक व परिचर यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रा. जगन्नाथ दरंदरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत, रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव उमाकांत जावळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र संपकाळे, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, संचालक प्रकाश अत्तरदे व गोपाळ ढाके, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिचोले, विजय पवार व अलाउद्दीन शेख, महापालिकेचे प्रशासन अधिकारी खलील शेख, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड आणि पर्यवेक्षक पी. जी. बागुल उपस्थित होते. यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती विकसित करण्याची तसेच त्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पौर्णिमा पाटील यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक पी. जी. बागुल यांनी मानले.



Post a Comment