महात्मा फुले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी कार्डचे वितरण
धरणगाव : शहरातील महात्मा फुले हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासात मदत व्हावी आणि त्यांना परीक्षेत चांगले यश संपादन करता यावे, या उद्देशाने धरणगाव रोटरी क्लबच्या वतीने आयडियल स्टडी कार्डचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एम.बी.मोरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे सदस्य तथा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी दिनेश माळी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी दिनेश माळी यांनी विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी कार्ड व त्यासंबंधित शैक्षणिक ॲपची सविस्तर माहिती दिली. या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या प्रश्नसंचांचा आणि अभ्यास मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. नियमित अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
केवळ ६५ रुपयांत शैक्षणिक ॲप उपलब्ध
धरणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मनोज ठाकरे, सचिव रो. सुनील चौधरी, प्रोजेक्ट हेड रो. किरण पाटील, रो. दिनेश माळी व क्लबच्या सर्व सदस्यांच्या पुढाकारातून धरणगाव शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या शैक्षणिक स्टडी ॲपची मूळ किंमत १,५०० रुपये अधिक जीएसटी इतकी असताना, धरणगाव शहरातील विद्यार्थ्यांना ते केवळ ६५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सामाजिक कार्यात रोटरी क्लबचे योगदान
धरणगाव रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, कर्करोग तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, आरओ वॉटर फिल्टर प्लांट, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्लब समाजोपयोगी कार्यात योगदान देत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रमही क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार वर्गशिक्षक एस व्ही आढावे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा