Top News

बांभोरी पुलावरील भीषण अपघातात झुरखेड्याच्या तीन तरुणांचा मृत्यू; गावावर शोककळा!

अडीच महिन्यांत १२ बळी; महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

धरणगाव : तालुक्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात झुरखेडे येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी अशी मृत तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे झुरखेडे गावासह धरणगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

कारचा चक्काचूर; तिघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही तरुण कारने प्रवास करत असताना बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलावर त्यांच्या कारची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्रतापराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातातील मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने झुरखेडे गावातील नागरिकांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अडीच महिन्यांत १२ बळी; सुरक्षा उपाययोजनांची मागणी

दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांत या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे बांभोरी पूल परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पुलावर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसणे, रिफ्लेक्टरचा अभाव आणि दिशादर्शक सूचना फलकांची कमतरता असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रकाशव्यवस्था, रिफ्लेक्टर, योग्य सूचना फलक आणि आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बांभोरी पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज