Top News

तिसऱ्या महायुद्धाची भीती की आपत्कालीन सुरक्षेची तयारी? जगातील अनेक देशांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!


जपान, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांकडून ७२ तासांच्या आपत्कालीन गरजांसाठी अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचे निर्देश

जगभरातील वाढता भू-राजकीय तणाव, संभाव्य युद्धजन्य परिस्थिती, सायबर हल्ले, नैसर्गिक आपत्ती आणि वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका लक्षात घेता अनेक विकसित देशांनी आपल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. जपान, ब्रिटन आणि युरोपातील विविध देशांमध्ये नागरिकांनी किमान ७२ तास पुरेल इतके अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तू घरात उपलब्ध ठेवाव्यात, अशा स्वरूपाच्या सूचना चर्चेत आहेत.

या घडामोडींमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असला, तरी या सूचनांचा अर्थ युद्ध निश्चित होणार आहे, असा होत नाही. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, सायबर हल्ले, ऊर्जा संकट किंवा युद्धजन्य परिस्थिती अशा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात नागरिकांची गैरसोय होऊ नये, हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

जपानमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूकंपप्रवण क्षेत्रात असल्यामुळे तेथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. भूकंप आणि सुनामीच्या पूर्वानुभवातून जपानने आपत्ती व्यवस्थापनाची मजबूत यंत्रणा विकसित केली आहे. नागरिकांनी किमान तीन दिवस पुरेल इतके अन्न, पिण्याचे पाणी, रोख रक्कम, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आणि प्राथमिक उपचार साहित्य जवळ ठेवावे, असे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

तसेच आपत्तीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी स्थलांतर मार्ग, आपत्तीग्रस्त क्षेत्रांचे नकाशे आणि सुरक्षित निवारा केंद्रांची माहिती आधीपासून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

ब्रिटनचा 'Be Ready' उपक्रम

ब्रिटन सरकारने 'Be Ready' या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेट आणि दळणवळण सेवा बंद पडणे, सायबर हल्ले किंवा प्रतिकूल हवामान यांसारख्या परिस्थितींचा विचार करून नागरिकांनी आवश्यक तयारी ठेवावी, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

घरामध्ये पिण्याचे पाणी, टिकाऊ अन्नपदार्थ, टॉर्च, बॅटरी, मोबाईल चार्जिंगची साधने, प्राथमिक उपचार पेटी आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे.

युरोपातील अनेक देशांकडून ७२ तासांच्या तयारीचे आवाहन

बेल्जियम, आयर्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड, नॉर्वे, फिनलंड यांसह युरोपातील विविध देशांमध्ये नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी किमान ७२ तास स्वतःची व्यवस्था करण्याच्या सूचना चर्चेत आहेत. युरोपियन युनियनकडूनही नागरिकांच्या आपत्तीविषयक सज्जतेवर भर दिला जात आहे.

यामध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे, प्राथमिक उपचार साहित्य, प्रकाशाची साधने, संवादासाठी आवश्यक उपकरणे आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.

अमेरिकेची लष्करी तळांसाठी ९० दिवसांच्या तयारीची योजना

अमेरिकेच्या संदर्भात व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब मांडण्यात आली आहे. परदेशातील लष्करी तळांवर बाहेरून होणारा पुरवठा काही काळासाठी खंडित झाला, तरी तेथील यंत्रणा कार्यरत राहावी, यासाठी सुमारे ९० दिवसांच्या आवश्यक साठ्याची तयारी करण्याबाबत चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामध्ये अन्न, पाणी, ऊर्जा, वीजपुरवठा आणि इतर आवश्यक लष्करी साधनसामग्रीचा समावेश आहे. अमेरिकेच्या या तयारीमुळे आंतरराष्ट्री तीव्र झाली आहे.

प्रत्येक नागरिकाने स्वतःची आपत्कालीन तयारी ठेवणे आवश्यक

जगातील सध्याच्या परिस्थितीकडे केवळ युद्धाच्या भीतीने पाहण्यापेक्षा आपत्ती व्यवस्थापन आणि वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल. प्रत्येक कुटुंबाने किमान तीन महिने पुरेल इतक्या आवश्यक वस्तूंची व्यवस्था करून ठेवणे ही काळाची गरज आहे.

यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश असावा :

१. पिण्याचे पुरेसे पाणी. २. टिकाऊ अन्नपदार्थ आणि खाद्यसामग्री. ३. प्राथमिक उपचार पेटी आणि नियमित वापरातील आवश्यक औषधे. ४. टॉर्च, अतिरिक्त बॅटरी आणि प्रकाशाची साधने. ५. मोबाईल चार्जर आणि पॉवर बँक. ६. महत्त्वाची कागदपत्रे आणि त्यांची सुरक्षित प्रत. ७. आवश्यक रोख रक्कम. ८. कुटुंबातील सदस्यांचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन मदत क्रमांक.

भीती नव्हे, तर सज्जता महत्त्वाची!

जगातील विविध देशांकडून सुरू असलेल्या या तयारीकडे तिसऱ्या महायुद्धाची निश्चित पूर्वसूचना म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. मात्र, कोणतीही आपत्ती किंवा आणीबाणी अचानक उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन नागरिकांनी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

वाहन चालवताना अपघात होणारच असे नाही; मात्र सुरक्षिततेसाठी सीटबेल्ट लावला जातो. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवणारच असे नाही; परंतु तिचा सामना करण्यासाठी आधीपासून सज्ज राहणे हीच सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे.

संकट येण्याची वाट पाहण्यापेक्षा संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहणे, हाच या जागतिक घडामोडींचा महत्त्वाचा संदेश आहे.

 ✒️गजानन विनायकराव नागपुरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज