![]() |
| स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर आता गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचे महत्त्वपूर्ण पाऊल |
जलजीवन मिशनअंतर्गत योजनेस शासनाची प्रशासकीय मान्यता
धरणगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आलेल्या धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगरच्या विकासाला आता आणखी बळ मिळाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावासाठी तब्बल १८ कोटी १७ लाख ३३ हजार रुपयांच्या स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेचा शासन निर्णय मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे डॉ. हेडगेवार नगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. हेडगेवार नगरला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर नव्या ग्रामपंचायतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य देत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवून दिली आहे.
या योजनेचा दरडोई खर्च निर्धारित निकषांपेक्षा अधिक असल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता आवश्यक होती. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने योजनेस मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचे नियोजन आहे. प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या क्षमतेनुसार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जलजीवन मिशनच्या राज्य हिश्श्यातून ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया व निविदा कार्यवाही पूर्ण करून योजना निर्धारित कालावधीत कार्यान्वित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती आणि त्यानंतर मोठ्या निधीच्या पाणीपुरवठा योजनेला मिळवून दिलेली मंजुरी, या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे डॉ. हेडगेवार नगरच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विशेषतः भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने हेडगेवार नगरवासीयांनी पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा