Top News

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये बापूंच्या विचारांची शाळा; सत्य पेटीने जिंकली मनं


धरणगाव ( प्रतिनिधी ) इथे आज घंटा वाजली नाही, छडीचा आवाज आला नाही, तर सारा दिवस फक्त गांधीजींच्या विचारांचा जागर झाला. पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे महात्मा गांधी , लालबहादूर शास्त्री जयंती केवळ साजरी नाही तर अक्षरशः जगली गेली.

शाळेचे उपक्रमशील शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांच्या संकल्पनेतून आणि पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांच्या पुढाकाराने आज शाळेचे रूपच पालटले होते. वर्गाच्या भिंतीवर पुस्तकातील धडे नव्हते तर बापूंची ११व्रते लिहिली होती.

 शाळेची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने नव्हे तर सर्वधर्म प्रार्थनेने झाली. 'वैष्णव जन तो तेणे कहिये' आणि 'रघुपति राघव' च्या सुरात अवघी शाळा न्हाऊन निघाली.

सत्यपेटी - धाडसाची नवी सुरुवात

आजच्या कार्यक्रमाचा कळस ठरला तो म्हणजे सत्यपेटीचे उद्घाटन. शाळेच्या दर्शनी भागात एक पेटी ठेवण्यात आली आहे. त्यावर लिहिले आहे, घाबरू नका, सत्य लिहा.

 मुख्याध्यापक डी. एस. पाटील म्हणाले , "मुलांना मनातले सत्य निर्भयपणे मांडता यावे, शाळेविषयी, शिक्षकांविषयी, व्यवस्थे विषयी त्यांना जे वाटते ते त्यांनी निनावी पद्धतीने सांगावे यासाठी ही पेटी आहे." दर शनिवारी या पेटीतील चिठ्ठ्यांवर आम्ही चर्चा करतो.

वर्ग नाही संवाद - बापूंच्या विचारांची शाळा

आज वर्गात फळा नव्हता. मुले जमिनीवर गोलाकार बसली होती. शिक्षक शिकवत नव्हते तर संवाद साधत होते. विषय होता -' आज गांधीजी असते तर त्यांनी मोबाईलचा वापर कसा केला असता ?' 'प्लास्टिकच्या कचऱ्यावर बापूंनी काय उपाय सांगितला असता ?' मुलांच्या उत्तरांनी शिक्षकही अवाक झाले.

दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ वैशाली गालापुरे,प्रदीप असोदेकर, गणेश सूर्यवंशी, सुरेंद्र सोनार, नंदू पाटील, संजय बेलदार, निरज शिंदे, रविंद्र पाटील, गोपाल चौधरी, गोपाल सोनवणे, प्रवीण पाटील, राजेश ठाकरे, प्रशांत महाजन यांचे सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज