Top News

दूध उत्पादक सक्षम झाला, तरच दूध संघ खऱ्या अर्थाने सक्षम” — पालकमंत्री गुलाबराव पाटील


सात तालुक्यांतील ३२८ दूध संस्थांचा सहभाग; दूध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा घेण्याच्या सूचना

जळगाव, प्रतिनिधी दि. ६ सप्टेंबर : दूध उत्पादक हा दूध संघाचा खरा केंद्रबिंदू असून, दूध उत्पादक सक्षम झाला तरच दूध संघ खऱ्या अर्थाने सक्षम होईल. कापूस उत्पादकांसाठी ज्याप्रमाणे सीसीआय महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचप्रमाणे दूध उत्पादकांसाठी सहकारी दूध संघ आणि गावपातळीवरील दूध संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढविणे, त्यांना योग्य बाजारपेठ व दर मिळण्यासाठी सहकारी व्यवस्था मजबूत करणे, शासन व एनडीडीबीच्या विविध योजनांचा लाभ पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचविणे आणि दूध संकलनासोबत गुणवत्तेत वाढ करणे याला संघाने प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.


जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने जळगाव येथील यश लॉन्स येथे आयोजित जिल्ह्यातील 7 तालुक्यांच्या दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

दूध व्यवसायातून उत्पादकाला नियमित उत्पन्न मिळत असल्याने खाजगी विक्री कमी करून सहकारी संघाला जास्तीत जास्त दूध देण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना पशुपालन व दुग्ध व्यवसायाशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळावे यासाठी बँकांनी सहकार्य करावे. कर्ज व अर्थसहाय्याच्या योजनांबाबत बँक अधिकारी आणि दूध उत्पादकांची संयुक्त बैठक दूध संघाने आयोजित करावी, अशी सूचनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पशुपालकांना गाय-म्हैस खरेदीसाठी उपलब्ध अनुदान योजनांचा प्रचलित निकषांनुसार लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा; पशुधन खरेदी, गोठा, पशुखाद्य व दुग्ध व्यवसायासाठी कर्जसुविधांबाबत बँक अधिकारी व दूध उत्पादकांची संयुक्त बैठक घ्यावी; दूध तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न करावा आणि गुणवत्तापूर्ण पशुखाद्याच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. नवीन दूध संस्थांच्या प्रस्तावांचा विचार करताना त्यातून दूध संकलन आणि उत्पादकांचा प्रत्यक्ष फायदा वाढणार आहे का, हे पाहावे. तसेच दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा घेऊन दूध उत्पादकांच्या अडचणींचा आढावा घ्यावा, असे सांगत संघाच्या आवश्यक बाबींसाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री तथा दूध संघाचे संचालक गुलाबराव पाटील यांनी दिली.


कार्यशाळेत जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व जामनेर या सात तालुक्यांतील ३२८ दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी सहभागी झाले. प्रतिनिधींनी दूध संकलन, गुणवत्ता, पशुखाद्य, पशुपालन व संघाकडून अपेक्षित सुविधांबाबत अडचणी व सूचना मांडल्या. त्यांच्या प्रश्नांना संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी उत्तरे देत प्राप्त सूचना व अडचणींवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

संचालक प्रमोद पाटील यांनी खाजगी दूध विक्री कमी करून संघाचे दूध संकलन वाढविण्यासोबतच दुधाची गुणवत्ता, फॅट व एसएनएफ सुधारण्यावर भर देण्याचे आवाहन केले. सालबर्डी संस्थेचे अमोल पाटील व कळमसळे संस्थेचे रोहित पाटील यांनी दूध उत्पादकांसाठी संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत संघाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या तसेच संघाला सातत्याने गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा करणाऱ्या सुमारे २२ दूध उत्पादक संस्थांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यशाळेस संचालक मधुकर राणे, अरविंद देशमुख, शामलताई झांबरे, छायाताई देवकर, दगडूदादा चौधरी, रमेश पाटील, नितीन चौधरी, प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी तसेच दूध संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संकलन विभागाचे व्यवस्थापक जयेश पाटील यांनी केले. दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज