ब्रम्हपुरी: ‘चला, मिळून उभारूया नालंदा अभियान कॅम्पस!’ या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातील वायफळ येथील नालंदा अभियान कॅम्पस उभारणीत समाजाचा सहभाग : एक संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा नुकतेच ब्रम्हपुरी पब्लिक स्कूलच्या सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रम्हपुरीचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नालंदा अकॅडमी, वर्धाचे संस्थापक अनुप कुमार विचार मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेश कांबळे यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा संदर्भ देत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीची दिशा निश्चित करता येते, असे सांगितले. समाजातील आर्थिक तथा बौद्धिक सामर्थ्याचा उपयोग रचनात्मक, विधायक आणि समाजोपयोगी कार्यासाठी झाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर अनेक पिढ्यांना होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देणे पुरेसे नसून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या दृष्टीने नालंदा अभियान कॅम्पससारख्या उपक्रमांना समाजाने पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख मार्गदर्शक अनुप कुमार यांनी नालंदा अभियानाच्या कार्याची माहिती दिली. नालंदा अभियानाच्या माध्यमातून आर्थिक तथा सामाजिकदृष्ट्या मागास पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक संधी आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले.
या उपक्रमातून मार्गदर्शन घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांत प्रवेश प्राप्त केला आहे, त्यांनी नालंदाच्या कार्यासंबंधी समाजमाध्यमांवर असलेल्या विविध दृकश्राव्य लघु-चलचित्रपटांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.
नालंदा अभियान कॅम्पस हा केवळ वास्तू उभारणीचा प्रकल्प नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे शैक्षणिक केंद्र उभारण्याचा प्रयत्न असून या उपक्रमाला समाजातील विविध घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी नालंदा ने ज्यांच्या पंखांना बळ दिले, ज्यांनी गडचिरोली ते जेएनयू आणि झेड. पी. स्कूल ते मँचेस्टर विद्यापीठ असा प्रवास केला अशा नालंदाच्या माजी विद्यार्थ्यांची मनोगते देखील झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुफान अवताडे, प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे सदस्य ॲड. दिपांकर कांबळे तर आभार शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा ब्रह्मपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रिमा कांबळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , शिक्षणप्रेमी नागरिक, संस्थेद्वारा संचालित विविध आस्थापनातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment