![]() |
हजारो भाविकांची उपस्थिती; लेझीम, आदिवासी युवकांचे नृत्य व आकर्षक स्वागत ठरले मिरवणुकीचे वैशिष्ट्य |
एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत एरंडोल शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडली. पहाटे पाच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान गुलालासह विविध रंगांच्या कागदी व चमकीच्या पाकळ्यांचा वर्षाव करून गणरायाचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
शहरात सकाळपासूनच लहान गणेश मंडळांनी मिरवणूक काढून विधिवत पूजा केली व गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पांडववाडा मित्र मंडळ, मरीमाता चौक मित्र गणेश मंडळ आदी मंडळांनी सकाळीच विसर्जन केले. दुपारी चार वाजता शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जयगुरू व्यायाम शाळेचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता. चौक गणेश मंडळ, श्री सावता माळी व्यायाम शाळा, बालवीर गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, नम्रता गणेश मंडळ, माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ, अखिल ब्रह्मवृंद युवक मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ, सर्वोदय मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, संताजी मित्र मंडळ, जयहिंद व्यायाम शाळा, जय बजरंग मित्र मंडळ, हरीपुरी युवक गणेश मंडळ आणि नागराज मित्र मंडळ अशी प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.
मिरवणुकीत महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत सहभागी झाले होते. नम्रता गणेश मंडळातील आदिवासी युवकांचे नृत्य विशेष आकर्षण ठरले. विविध राष्ट्रीय महापुरुषांचे छायाचित्र असलेले फलक, घोषणांचे फलक आणि भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी गुलालाचा कमी प्रमाणात वापर करून विविध रंगांच्या कागदी व चमकीच्या पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. नागोबा मढी येथे श्री सावता माळी गणेश मंडळाचा गणपती आल्यानंतर नागराज गणेश मंडळातर्फे करण्यात आलेले स्वागत विशेष आकर्षण ठरले. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गांधीपुरा भागातील जयहिंद चौकात आकर्षक रोषणाई करून गणपतीचे स्वागत करण्यात आले. तसेच होळी मैदान येथे जयहिंद गणेश मंडळाच्या गणपतीचे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळातर्फे स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने दक्षता घेतली. प्रमुख ठिकाणी भाविक व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
नगरपालिका कार्यालयाजवळ पालिकेतर्फे गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाल पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, निवृत्त तहसीलदार अरुण माळी आणि उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गणेशमूर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
बाखरूम बाबा मशिदीजवळ पत्रकार जावेद मुजावर व माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच गणपतीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
विसर्जन मिरवणुकीतील सुमारे २० ते २५ फूट उंचीच्या गणेशमूर्ती नेताना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, महसूल व नगरपालिका कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

Post a Comment