दाभडी, ता. आर्णी | प्रतिनिधी सुरज पवार
दाभडी, ता. आर्णी येथील महादेव मंदिर हॉलमध्ये तेंदूपत्ता संकलन व विक्री संदर्भात विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनहक्क कायदा, ग्रामसभेचे अधिकार, तेंदूपत्ता संकलन, वाहतूक परवाना तसेच विक्री व आर्थिक नियोजनाबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश उपेवाड यांनी केले, तर प्रास्ताविक मोहन जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष भारत गाडेकर होते.
प्रमुख मार्गदर्शक श्रीकांत सर यांनी वनहक्क कायदा व ग्रामसभेच्या अधिकारांची माहिती देताना “जशी देशाची लोकसभा, तशी गावाची ग्रामसभा” ही संकल्पना स्पष्ट केली. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे महत्त्व तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून वनोपजाचे व्यवस्थापन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अभिलेख पत्र, सामूहिक वनहक्क व वनोपजावरील स्वामित्व हक्क याबाबत माहिती देण्यात आली. तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेने तयार केलेल्या संवर्धन आराखड्यानुसार करण्यावर भर देण्यात आला. तसेच ग्रामसभेला वनोपज संकलन व विक्रीचे अधिकार, तेंदूपत्ता वाहतूक परवाना आणि व्यापारी निवडीच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तेंदूपत्ता विक्रीतून मिळणारी रक्कम ‘ग्रामसभा व गाव’ यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्याची प्रक्रिया, टेंडरिंग, व्यापारी निवड, मजुरी व बोनसचे वाटप, तसेच व्यवहारातील पारदर्शकता याबाबतही माहिती देण्यात आली. माल उचलण्यापूर्वी उर्वरित रक्कम घेणे आणि ‘A1’ पुस्तिकेत दररोजचा हिशोब नोंदविण्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.
येत्या १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान आयएफआर धारकांना ७/१२ देण्याबाबत मंत्र्यांच्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान स्फूर्तीदायक ‘ग्रामसंघ गीत’ सादर करण्यात आले. त्यानंतर जाधव सर यांनी जिल्हा महासंघाच्या कामकाजाची माहिती देत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष भारतभाऊ गाडेकर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. अतुल ढबाले यांनी आभार मानले.
यावेळी फेलो रोशना आडे, मंगेश नेवारे, सतीश राठोड, अक्षय कुमरे, सावित्रा मसराम, सागर आत्राम, संजना नैताम, सोनू कोडापे, कुणाल चांदेकर, प्रभू मडावी यांच्यासह ग्रामस्थ व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment