Top News

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतरही माहिती न मिळाल्याने NHAI कडे RTI

मुख्यमंत्री सचिवालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनंतरही कार्यवाहीचा खुलासा नसल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांचा माहिती अधिकाराचा आधार; फाईल नोटिंग, पाहणी अहवाल व रोड सेफ्टी ऑडिटची मागणी

धरणगाव पाळधी | प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाळधी खुर्द येथील पोखरी चौफुली (गायळ माता मंदिर परिसर) येथे सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ऑनलाइन RTI अर्ज दाखल केला आहे.

यापूर्वी या धोकादायक चौफुलीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी किरण माळी यांनी मुख्यमंत्री सचिवालय, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागास आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही संबंधित अधिकाऱ्यांना प्रचलित नियमांनुसार कार्यवाही करून अर्जदारास माहिती देण्याचे व झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, वारंवार ई-मेल, दूरध्वनी व व्हॉट्सअॅपद्वारे पाठपुरावा करूनही समाधानकारक माहिती किंवा कार्यवाहीचा लेखी अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे अखेर माहितीचा अधिकार कायद्याचा आधार घेत NHAI कडे ऑनलाइन RTI अर्ज दाखल करण्यात आला.

या RTI अर्जामध्ये निवेदनावर झालेली कार्यवाही, फाईल नोटिंग, कार्यालयीन आदेश, प्रत्यक्ष पाहणी अहवाल, रोड सेफ्टी ऑडिट, सुरक्षाविषयक तांत्रिक अहवाल तसेच संबंधित पत्रव्यवहाराच्या प्रमाणित प्रती मागविण्यात आल्या आहेत.
NHAI ने हा अर्ज स्वीकारला असून त्यास नोंदणी क्रमांक NHAIN/R/E/26/05871 प्रदान करण्यात आला आहे. आता माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार विहित मुदतीत संबंधित माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी सांगितले की, "पाळधी-पोखरी चौफुलीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात. या प्रकरणात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांना योग्य माहिती मिळावी, हीच RTI दाखल करण्यामागील भूमिका आहे."

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज