यवतमाळ / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी मागणी पत्रकार, समाजसेवक व लेखक सुरज सुधाकरराव पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शेती, सिंचन, जलसंधारण, ग्रामीण विकास, रोजगार हमी, आदिवासी व वंचित घटकांचे कल्याण तसेच राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
स्व. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून देशभरात मान्यता मिळाली असून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शेतकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करणे योग्य व न्याय्य ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती सुरज सुधाकरराव पवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
Post a Comment