![]() |
| पर्यावरण संवर्धनाचा संदेश; समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळाचा संयुक्त उपक्रम |
खर्ची बु. : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खर्ची बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच नवीन तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमास प्रा. योगेश माळी (समाजकार्य विभाग), जि. प. शिक्षिका रेखा बाविस्कर, श्रीमती माधुरी बाविस्कर, सौ. प्रीती चौधरी, आशा सेविका सुनीताताई माळी, प्रतिभा माळी व महिला मंडळ तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती माधुरी बाविस्कर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांनी समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळाच्या वतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, वृक्षारोपण हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी राहुल बागुल, रोशन देशमुख, नंदिनी पवार, माहेश्वरी वसावे, रोहिणी वळवी, तसेच कोतवाल, भूषण म्हसके, विशाल माळी व रुपेश सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला मंडळाच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशातून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment