Top News

व.सा.का. विक्री प्रक्रिया थांबवण्यात यश; नवनिर्माणासाठी ‘ऑगस्ट क्रांती संकल्प मेळावा’ उत्साहात

१४ हजार ५०० सभासद व ७०० कामगारांच्या हितासाठी लढ्याला पहिले मोठे यश; आता नवनिर्माणासाठी थकहमीची मागणी

व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑगस्ट क्रांती संकल्प मेळावा’ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्माणासाठी सुरू असलेल्या लढ्याला यावेळी महत्त्वाचे यश मिळाले. व.सा.का.ची विक्री प्रक्रिया तात्काळ थांबवावी, ही समितीची प्रमुख मागणी होती. त्यानुसार जळगाव जिल्हा बँकेने व.सा.का.ची विक्री प्रक्रिया थांबवली असून, या निर्णयाचे मेळाव्यात स्वागत करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या व.सा.का.मुळे परिसरातील शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या आर्थिक जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. व.सा.का.चे कार्यक्षेत्र ७ तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये असून, तब्बल १४ हजार ५०० सभासद आणि सुमारे ७०० कामगार या कारखान्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे व.सा.का.चा प्रश्न हा केवळ एका कारखान्याचा नसून हजारो शेतकरी-कामगारांच्या भवितव्याशी संबंधित असल्याची भूमिका मेळाव्यात मांडण्यात आली.


समितीच्या म्हणण्यानुसार, व.सा.का.च्या पुनरुज्जीवनासाठी मागील अडीच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने विविध माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला विरोध करत शेतकरी व कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समितीने सातत्याने भूमिका मांडली. अखेर विक्री प्रक्रिया थांबवण्यात आल्याने या लढ्याला पहिले महत्त्वाचे यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत करत पुढील लढ्याची दिशा स्पष्ट केली. विक्री प्रक्रिया थांबवणे हे पहिले पाऊल असून, आता व.सा.का.चे प्रत्यक्ष नवनिर्माण आणि पुनरुज्जीवन करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे, अशी भूमिका मांडण्यात आली.

राजगड कारखान्याप्रमाणे व.सा.का.लाही शासनाने तत्काळ थकहमी जाहीर करून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच शेकडो कामगारांना रोजगार आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे उपस्थितांनी सांगितले.


मेळाव्यात व.सा.का. नवनिर्माण समितीचे अध्यक्ष निलकंठ प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग हरी पाटील, सचिव ईश्वर माधवराव पाटील, समितीचे सल्लागार, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्री प्रक्रिया थांबवण्यात आलेले यश हे सामूहिक संघर्षाचे फलित असल्याचे सांगत, आता व.सा.का.च्या नवनिर्माणासाठी पुढील टप्प्यात अधिक ताकदीने पाठपुरावा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शेतकरी, कामगार आणि तरुणांनी एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

व.सा.का.च्या विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने शेतकरी-कामगारांच्या लढ्याला नवे बळ मिळाले असून, आता शासन व संबंधित यंत्रणांनी व.सा.का.च्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निर्णय घ्यावा आणि जळगाव जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा मेळाव्यात व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज