![]() |
| अवैध दारूविक्रीमुळे वाढत्या सामाजिक समस्यांवर महिलांचा आक्रमक पवित्रा; पोलीस व दारूबंदी विभागाकडे निवेदन देण्याचा निर्णय |
धरणगाव प्रतिनिधी :
भवरखेडे : गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालून गावात दारूबंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी भवरखेडे येथील महिलांनी एकजूट दाखवत ग्रामसभेत जोरदार एल्गार पुकारला. दि. १३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीच्या मागणीवर सविस्तर चर्चा होऊन दारूबंदीचा ठराव क्रमांक ३ मंजूर करण्यात आला.
गावातील अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्या वाढत असून, कुटुंबातील वाद, आर्थिक नुकसान तसेच तरुण पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दारूविक्रीमुळे गावातील शांतता व सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दारूबंदीच्या मागणीसंदर्भात ग्रामसेवक सी. एन. सोनवणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या ठरावाच्या पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी भवरखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला यांच्यावतीने धरणगाव पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव आणि दारूबंदी विभाग जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
गावातील महिलांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, गावात शांतता आणि सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे भवरखेडे गावात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावानंतर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment