Top News

शेतकऱ्यांचे गोसेखुर्द प्रकल्पाचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तनय देशकर ‘ॲक्शन मोड’वर!


शेतकऱ्यांचे अनुदान मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवू - तनय देशकर.

ब्रह्मपुरी प्रतिनिधी संजय बागडे : गोसेखुर्द नहर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तनय अतुल देशकर ॲक्शन मोडवर आले आहेत. या मागणीसाठी तनय देशकर यांनी यापूर्वी ९ जुलै २०२६ रोजी संबंधित प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक महिने उलटून प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांनी आता प्रशासनाला स्मरण पत्र–१ देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गोसेखुर्द नहर प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणे अपेक्षित असताना, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. यावर्षी पाण्याअभावी शेती अपेक्षित प्रमाणात पिकली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान मिळत नसल्याने आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.

या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, अनुदानासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलनाच्या मार्गावर जावे लागणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे केवळ कागदोपत्री बाब म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी तनय देशकर यांनी केली आहे.

“शेतकऱ्यांचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना आता आश्वासन नको, तर त्यांच्या हक्काचे अनुदान हवे आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पात्र शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान अदा करावे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, हीच आमची भूमिका आहे,” अशी ठाम भूमिका तनय देशकर यांनी मांडली.

दरम्यान, स्थानिक पातळीवर पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्यास हा विषय मंत्रालय स्तरापर्यंत नेऊन संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही तनय देशकर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज