Top News

महावितरणचा शेतकऱ्यांसोबत विजेचा लपंडाव; रात्रीही वीजपुरवठा नसल्याचा आरोप

भवरखेडे येथील शेतकरी त्रस्त; अर्ध्या रात्री धरणगाव उड्डाणपुलावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको.

धरणगाव | प्रतिनिधी

भवरखेडे परिसरातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवसा तर वीजपुरवठा होत नाहीच, मात्र रात्रीच्या वेळीदेखील वीजपुरवठा केला जात नसल्याचा आरोप भवरखेडे येथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महावितरणचा शेतकऱ्यांसोबत जणू काही विजेचा लपंडावच सुरू असल्याची भावना भवरखेडे येथील शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.

शेतातील उभ्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी वीजपुरवठा अत्यंत आवश्यक आहे. मात्र, दिवसभर वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी रात्रीच्या वीजपुरवठ्याची प्रतीक्षा करतात. परंतु रात्रीच्या वेळीदेखील वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर जागे राहत असूनही वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अनियमित वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या भवरखेडे येथील शेतकरी बांधवांनी अर्ध्या रात्री धरणगाव येथील महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी वीजपुरवठ्याबाबत विचारणा करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धरणगाव उड्डाणपूल येथे दी.६ रोजी मध्यरात्री रस्ता रोको आंदोलन केले.वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार, दिवसा व रात्री वीज का उपलब्ध होत नाही तसेच कृषीपंपांसाठी नियमित वीजपुरवठा कधी मिळणार, याबाबत विचारणा केल्यानंतरही शेतकऱ्यांना स्पष्ट व निश्चित माहिती मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये महावितरण प्रशासनाविषयी आणखी नाराजी निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषीपंपासाठी वीज मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकरी रात्री उशिरापर्यंत जागे राहत असतात. वीज सुरू झाली की मोटार सुरू करण्यासाठी शेतात धाव घ्यावी लागते. मात्र, अनेकदा वीजच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना निराश व्हावे लागत आहे. उभ्या पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

दिवसा वीज नाही आणि रात्रीही वीजपुरवठा नाही, मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची आणि पिकांना पाणी कधी द्यायचे असा संतप्त सवाल भवरखेडे येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.भवरखेडे परिसरात शेती हा अनेक कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय आहे.वीजपुरवठा अनियमित राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांनी धरणगाव महावितरण प्रशासनाकडे तातडीने कृषी वीजपुरवठा नियमित व सुरळीत करण्याची मागणी केली आहे. दिवसा अथवा रात्री निश्चित वेळापत्रकानुसार पुरेसा वीजपुरवठा करण्यात यावा, वारंवार होणारे वीजखंडित प्रकार थांबवावेत आणि वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्यांना योग्य व समाधानकारक उत्तरे द्यावीत आणि उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांच्या संतापात भर घालू नये, अशीही मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

महावितरण प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन भवरखेडे परिसरातील कृषी वीजपुरवठा नियमित करावा, अन्यथा शेतकरी अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही संतप्त शेतकरी बांधवांकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज