नागभीड : माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा नागरिकांना पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांना माहिती अधिकाराचा वापर, अर्ज प्रक्रिया, प्रथम अपील, माहिती मिळण्याची कालमर्यादा तसेच उपलब्ध कायदेशीर अधिकारांची पुरेशी माहिती नसल्याने दि. २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिनाचा उपयोग व्यापक जनजागृतीसाठी करण्यात यावा.
शासनाच्या दि. २० सप्टेंबर २००८, दि. १५ सप्टेंबर २००९ आणि दि. ०५ मे २०१५ रोजीच्या संदर्भीय निर्णयांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विशेष माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
‘गाव ते गाव – माहिती अधिकार जनजागृती’ या संकल्पनेतून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत माहिती अधिकाराची माहिती पोहोचविण्यात यावी. कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ, महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थी, बचत गट, सामाजिक संस्था, पत्रकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करण्यात यावा.
जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यक्रमांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक, संबंधित विभागांचे अधिकारी, कायदेतज्ज्ञ व माहिती अधिकार विषयातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करून नागरिकांना थेट मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.
कार्यक्रमांमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा, कोणत्या अधिकाऱ्याकडे अर्ज करावा, माहिती मिळण्याची कायदेशीर मुदत, प्रथम व द्वितीय अपील प्रक्रिया तसेच माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४ अंतर्गत स्वयंस्फूर्तीने प्रसिद्ध करावयाची माहिती याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात यावे.
ग्रामपंचायत स्तरावर निधी, विकासकामे, शासकीय योजना, लाभार्थी यादी, खर्च, ग्रामसभा व इतर सार्वजनिक कामकाजाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात यावी.
तसेच प्रत्येक ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा कार्यालयनिहाय व तालुकानिहाय अनुपालन अहवाल, उपस्थित नागरिकांची संख्या, सहभागी मान्यवर, राबविलेले उपक्रम आणि कार्यक्रमाची छायाचित्रे/व्हिडिओ यांची नोंद जिल्हास्तरावर संकलित करण्यात यावी.
माहिती अधिकार दिन हा केवळ एका दिवसाचा औपचारिक कार्यक्रम न ठेवता त्यानंतरही ग्रामीण भागात सातत्यपूर्ण जनजागृती व माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
“जागरूक नागरिक – पारदर्शक प्रशासन – सक्षम गाव” या उद्देशाने दि. २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे साजरा करून माहिती अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ आवश्यक आदेश व निर्देश निर्गमित करण्यात यावेत असे NJA चे तालुका अध्यक्ष संजय बागडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment