प्रतिनिधी - संजय बागडे
नागभीड : विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने कुलर, पंखा किंवा इतर उपकरणांना गळतीचा करंट येणे, ओल्या हाताने विद्युत उपकरणांना स्पर्श केल्याने अपघात होणे अशा घटना अधूनमधून घडत असतात. या पार्श्वभूमीवर विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, या उद्देशाने सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे महावितरण नागभीडच्या वतीने वीज जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत वैद्य, सहायक अभियंता राकेश समर्थ, प्रधान तंत्रज्ञ दुर्वास करकाडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहायक अभियंता श्रीकांत वैद्य यांनी महावितरण कंपनीचा इतिहास, कार्यपद्धती आणि वीज वितरण व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. वीज वापरताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी करू नयेत, विद्युत उपकरणांमध्ये बिघाड किंवा वायरिंगमध्ये त्रुटी असल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
विशेषतः कुलर, पंखे, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या विद्युत उपकरणांना गळतीचा करंट येऊ शकतो. त्यामुळे ओल्या हाताने उपकरणांना स्पर्श न करणे, अर्थिंगची योग्य व्यवस्था असणे आणि खराब वायर किंवा उपकरणांचा वापर टाळणे आवश्यक आहे, अशा सुरक्षिततेच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
सहायक अभियंता राकेश समर्थ यांनी सौरऊर्जेचे फायदे, हरित ऊर्जेचे महत्त्व तसेच विविध सौरऊर्जा योजनांची माहिती दिली. विजेची बचत ही आर्थिक बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचत’ याबाबतची शपथ घेतली. सुरक्षित पद्धतीने विजेचा वापर करणे, विजेची नासाडी टाळणे, ऊर्जा बचतीला प्राधान्य देणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांनी या उपक्रमासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेबाबत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल त्यांनी महावितरणचे आभार व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला आशिष गोंडाने सर, आशा राजुरकर मॅडम, किरण वाडीकर मॅडम, पराग भानारकर, सतीश जिवतोडे, नेहा कावडकर मॅडम, अंकिता गायधने मॅडम व रोहिनी डबले मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले, तर आभार सतीश जिवतोडे यांनी मानले. महावितरणच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन वीज बचत व हरित ऊर्जेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Post a Comment