![]() |
| पुण्याचे प्रशिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शन; फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन व समाजमाध्यम वाढीचे धडे |
धरणगाव : धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन, पिंप्री खुर्द यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी कार्यशाळा मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या कार्यशाळेत अमळनेर, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, चोपडा, यावल, बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, जळगाव, भुसावळ यांसह विविध ठिकाणांहून आलेल्या छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेसाठी पुणे येथून विशेष मार्गदर्शक म्हणून पंकज देशमुख सर उपस्थित होते. त्यांच्या ‘Click Hunt Films’ या माध्यमातून ते फोटोग्राफी व दृक्माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सहभागी छायाचित्रकारांना छायाचित्र संपादन, व्हिडिओ संपादन, कथाकथनाची प्रभावी पद्धत तसेच समाजमाध्यमांवरील कामाची वाढ याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान फोटोग्राफीतील आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेरा हाताळणीच्या विविध पद्धती, प्रकाशयोजना, छायाचित्राची रचना, योग्य क्षणाची निवड आणि तो प्रभावीपणे टिपण्याचे बारकावे यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मिळाल्याने सहभागी छायाचित्रकारांना नवीन तंत्रे समजून घेण्याची संधी मिळाली.
“प्रत्येक सत्रातून नवे शिकणे आणि प्रत्येक छायाचित्रातून स्वतःला अधिक चांगले घडवणे,” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे सहभागी छायाचित्रकारांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची ओळख, सर्जनशीलतेला चालना आणि व्यावसायिक कौशल्यविकासाला नवी दिशा मिळाली.
ग्रामीण भागातील छायाचित्रकारांना बदलत्या काळातील तंत्रज्ञान व आधुनिक माध्यमांची माहिती मिळावी, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
सूत्रसंचालन दुर्गेश गोसावी यांनी केले तर आभार श्याम पाटील यांनी मानले.

Post a Comment