प्रतिनिधी : संजय बागडे
नागभीड : येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक अस्वलाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अस्वल आल्याने प्रवाशांमध्ये भीतीसोबतच कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले.
अस्वल प्लॅटफॉर्म परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, वडसा-चंद्रपूर रेल्वे नागभीड स्थानकावर दाखल झाल्याने ट्रेनमधील प्रवासी तसेच स्थानकावरील नागरिकांनी अस्वलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
रेल्वे स्थानक परिसरात वन्यप्राण्यांचा वावर ही चिंतेची बाब असून, त्यातच अस्वलासारखा मोठा वन्यप्राणी वर्दळीच्या ठिकाणी आल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन व वनविभागाने आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment