Top News

बैलांच्या झुलींवर सामाजिक प्रश्नांना वाचा एरंडोलच्या प्रल्हाद महाजन यांचा पोळ्यानिमित्त अनोखा जनजागृती उपक्रम

एरंडोलच्या प्रल्हाद महाजन यांचा पोळ्यानिमित्त अनोखा जनजागृती उपक्रम

प्रतिनिधी | एरंडोल : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या झुलींवर विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्न मांडत एरंडोल येथील शेतकरी प्रल्हाद पितांबर महाजन यांनी यंदाही अनोखा जनजागृती उपक्रम राबविला. विखरण रस्त्यालगत राहणाऱ्या महाजन यांच्या या उपक्रमाचे शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.

बैलपोळ्याच्या दिवशी सजविण्यात आलेल्या बैलांच्या झुलींवर ‘नीट’ परीक्षा, टीईटी पेपरफुटी, मुलांना मोबाईल देण्यापूर्वी पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, तसेच कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाऐवजी जिल्हा परिषद शाळांच्या विकासावर खर्च झाला असता तर अनेक शाळा बंद पडल्या नसत्या, अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच बंद असलेला वसंत साखर कारखाना सुरू करण्याची मागणीही झुलींवरील संदेशातून मांडण्यात आली.

प्रल्हाद महाजन हे मागील सुमारे दहा वर्षांपासून बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या अंगावरील झुलींवर सामाजिक संदेश लिहून जनजागृती करीत आहेत. पारंपरिक सणाला सामाजिक भानाची जोड देत समाजातील ज्वलंत प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.

दरम्यान, यंदा महाजन यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले असले तरी एरंडोल तालुक्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलपोळा सणाच्या निमित्ताने पावसाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची व्यथा यांचाही झुलींवरील संदेशातून समावेश झाला असता, तर या जनजागृती उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप मिळाले असते, अशी प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज