प्रभात फेरी, पथनाट्य व प्रत्यक्ष स्वच्छतेतून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश
खर्ची, दि. २६ सप्टेंबर २०२६ : स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून स्वच्छ, सुंदर व निरोगी गावाची संकल्पना साकारण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत खर्ची येथे स्वच्छता मोहीम व जनजागृती उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मेरा युवा भारत, जळगाव, आत्मनिष्ठ युवक मंडळ, खर्ची आणि समाजकार्य विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रमाची सुरुवात माध्यमिक विद्यालय, खर्ची येथून प्रभात फेरीने करण्यात आली. यावेळी स्वच्छतेविषयक घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गावातील विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यानंतर स्वयंसेवकांनी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष साफसफाई करून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कचरा योग्य ठिकाणी टाकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता टाळणे आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत समाजकार्य विभागाचे प्रा. योगेश माळी, प्रशिक्षणार्थी राहुल बागुल, रोशन देशमुख, योगेंद्र अहिरे, वैशाली कोळी, नंदिनी पवार, महेश्वरी वसावे, करुणा पटले व युवराज गांगुर्डे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, ज्येष्ठ नागरिक मधुकर विसवे, दगडू माळी, हर्षल माळी, गोपाल मोपारी, बबलू माळी, अशोक मोपारी, कल्पेश माळी, रामचंद्र माळी, तात्या मगरे, विक्की माळी, चेतन वाघे, दिपाली महाजन तसेच महिला मंडळाच्या सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे,’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. युवकांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे खर्ची गावात स्वच्छतेविषयी जनजागृतीला चालना मिळाली.



Post a Comment