Top News

भानुदास विसावे यांची श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार


कुस्तीची गौरवशाली परंपरा जोपासण्याची मोठी जबाबदारी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

धरणगाव : येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन भानुदास शंकर विसावे यांची बिनविरोध व एकमताने निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून धरणगावमध्ये अनेक वर्षांपासून कुस्तीची परंपरा जोपासली जात आहे. श्रावण महिन्यातील चारही मंगळवारी येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले जाते. या कुस्त्यांमध्ये देशभरातून तसेच विविध भागांतून मल्ल सहभागी होऊन आपल्या कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करतात.

मरीआईच्या यात्रेनिमित्त महिनाभर विविध कुस्ती स्पर्धांचे आयोजन होत असून, हजारो भाविक या यात्रेला उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घेतात. मोठ्या प्रमाणावर मल्ल सहभागी होत असल्याने तसेच लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात असल्याने या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी मोठी असते.

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून भानुदास विसावे हे मंडळाच्या सहकार्याने तसेच पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने कुस्तीच्या या दंगलीचे नियोजन व आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण आणि पारंपरिक वातावरणात होणाऱ्या या कुस्ती स्पर्धांमुळे धरणगावच्या कुस्ती परंपरेला विशेष ओळख मिळाली आहे.

या उपक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दरवर्षी सहकार्य करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल भानुदास विसावे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सत्कारप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पीएम पाटील सर, अभिजीत पाटील, शिवसेना नेते विनय शशिकांत भावे, उपनगराध्यक्ष विजय महाजन, नगरपालिकेचे गटनेते विलास महाजन, शहरप्रमुख धीरेंद्र आप्पा यांच्यासह धरणगाव शहर व तालुक्यातील शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज